शरद पवार : मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अन् खूप काही शिकवणारे नेतृत्व!

By अतुल कुलकर्णी | Published: December 12, 2019 07:36 AM2019-12-12T07:36:07+5:302019-12-12T07:56:02+5:30

'सकाळपासून साहेबांनी जेवणही घेतलेले नाही. सतत फोनवर आहेत... बोलत आहेत, लोकांना भेटत आहेत...'

Sharad Pawar: Diplomatic politician, versatile personality and a lot of leadership! | शरद पवार : मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अन् खूप काही शिकवणारे नेतृत्व!

शरद पवार : मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अन् खूप काही शिकवणारे नेतृत्व!

Next

- अतुल कुलकर्णी (वरिष्ठ सहायक संपादक)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. त्यांची माझी पहिली भेट ते मुख्यमंत्री म्हणून नेवाश्याला आले तेव्हाची. त्यावेळी मी औरंगाबाद लोकमतमध्ये काम करत होतो. शरद पवार अहमदनगरला येणार होते, तेथून ते सगळ्या लेखक, कवी यांच्यासोबत नेवाश्याला बसमध्ये बसून येणार होते. आम्ही काही पत्रकार नगरला गेलो होतो. तेथून आम्ही एशियाड बसमध्ये बसून नेवाश्याला आलो. त्या प्रवासात त्यांनी लेखक आणि साहित्यिकांशी मारलेल्या गप्पा मी पाहिल्या. मुख्यमंत्री असे असतात ही माझ्या मनात त्यावेळी प्रतिमा तयार झाली.

पुढे मी मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि आता उद्धव ठाकरे यांना पाहत आलोय. या सगळ्यांची काही ना काही वैशिष्ट्ये नक्की आहे, त्यांचे अनेक चांगले गुणही आहेत. मात्र राजकारणाशिवाय साहित्य, नाट्य, कला, चळवळ, अर्थकारण, समाजकारण, विचारवंत, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा अनेक क्षेत्राची खडानखडा माहिती ठेवणारे, त्याच्या क्षेत्रात काय चालले आहे याविषयी स्वत:ची पक्की बैठक असणारे असे नेतृत्व मला आजपर्यंत पहायला मिळालेले नाही.

मी ‘२६/११ ऑपरेशन मुंबई’ हे पुस्तक लिहिले होते. त्याचा इंग्रजी अनुवाद अ‍ॅड. उदय बोपशेट्टी यांनी केला होता. इंग्रजी आणि मराठी अशी दोन्ही पुस्तके मी त्यांना दिल्लीत पाठवली होती. त्यावेळी त्यांचा माझा परिचय नव्हता. माझे पुस्तक त्यांच्या टेबलवर होते. त्यांना भेटायला दिल्लीत एशियन एजचे राजकीय संपादक व्यंकटेश केसरी गेले होते. त्यांना पाहून ते म्हणाले, तो अभिनेता अतुल कुलकर्णी याने २६/११ वरती पुस्तक लिहिले आहे... वाचले का?... त्यावर केसरी यांनी तो अतुल कुलकर्णी वेगळा आणि हे पुस्तक लिहिणारा वेगळा, असे म्हणत माझ्याबद्दलची माहिती त्यांना दिली होती. मी लोकमतसाठी आणि केसरी लोकमत टाईम्ससाठी असे आम्ही दोघे औरंगाबादेत पत्रकारिता करत होतो. त्यामुळे आमचा जुना परिचय होता तो असा कामी आला होता.

पुढे मी मुंबईत आल्यानंतर माझा त्यांचा परिचय वाढला. पत्रकार परिषदांमुळे भेटी वाढल्या. तसे त्यांच्या अनेक छटा जवळून पहायला मिळाल्या. अगदी गेल्यावर्षीची गोेष्ट. मी लिहीलेल्या ‘बिनचेह-याची माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावे अशी माझी इच्छा होती. म्हणून मी त्यांना भेटायला ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी गेलो. त्यांना माझी काही पुस्तकेही दिली. तुम्हीच प्रकाशनाला यावे असे सांगितले. त्यावर दोन दिवसात सांगतो असे ते म्हणाले. दुस-याच दिवशी त्यांच्या पीए चा फोन आला. सांगितले की साहेब, त्या दिवशी दिल्लीत आहेत. ज्ञानेश्वर मुळे यांचा कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. मी काय बोलणार होतो... पण दोन दिवसात ऑफिसच्या पत्त्यावर स्वत: शरद पवार यांच्या सहीचे पत्र आले.

कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याचे. खरे तर एकदा सांगितल्यावर पत्र पाठवण्याची गरज नव्हती, पण ते त्यांनी केले. पुढे अचानक त्यांच्या पायाचे दुखणे वाढले. पुण्यात ते घरात बसून राहीले. त्यामुळे ते दिल्लीलाही जाऊ शकले नाहीत. त्यांचे अत्यंत नजीकचे सहकारी आर.आर. पाटील यांच्या मुलीचे लग्न होते. त्यासाठीही त्यांना पुण्यात लग्न असूनही जाता आले नव्हते. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याची बातमी त्या काळात आली. तेव्हा पुन्हा त्यांच्या पीए चा फोन आला. साहेबांनी निरोप दिला आहे, असे सांगत ते म्हणाले, तुमचा कार्यक्रम घेतला असता आणि येता आले नसते तर तुमची अडचण झाली असती... वास्तविक हे सांगण्याची त्यांना काहीही गरज नव्हती. पण दुस-यांची काळजी घेणे, हा अनोखा स्वभाव मला भावला.

विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निकाल आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांना सांगितले, विधानसभेच्या ग्रंथालयात जा. आजवरच्या विविध नेत्यांची भाषणे पुस्तकांमध्ये आहेत, ती पुस्तके वाचा... असा सल्ला देणारा नेता आज शोधून ही सापडणार नाही...! ज्या तडफेने त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी कष्ट घेतले, स्वत:च्या तब्येतीची काळजी केली नाही, हे पाहिले तर त्यामागचे त्यांचे राजकारण जे काही असेल ते असो, पण वयाच्या ८० व्या वर्षी एवढे व्यस्त राहणे, सतत १८ तास काम करणे, जीद्दीने स्वत:ला झोकून देणे, कितीही ताण असला तरी डोके शांत ठेवून परिस्थिती हाताळणे, हे गुण घेण्यासारखेच आहेत.

आम्ही सहा ते आठ तास ऑफिसमधे काम करुन आलो तर दमलो म्हणून झोपी जातो. तेथे शरद पवार ज्या झपाटल्यागत काम करताना दिसतात तेव्हा आपलीच आपल्याला लाज वाटू लागते. या वयात तरुणांना विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा आग्रह करणे, भाषणे ऐका, भाषणांची पुस्तके वाचा असे सांगणे आणि स्वत: कायम व्यस्त रहाणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नाही.

मध्यंतरी ते पुण्यात एका कार्यक्रमाला गेले होते. तेथे त्यांनी भाषणात सांगितले होते, मी पूर्वी अ‍ॅम्बेसेडर गाडीतून फिरायचो तर माझ्या मागे सगळ्या अ‍ॅम्बेसेडर दिसायच्या... नंतर मी इनोव्हा घेऊन फिरु लागलो तर माझ्या मागे सगळ्या इनोव्हा दिसू लागल्या. आता मी गाडी बदलली तर माझ्या मागेही त्याच गाड्या दिसतात... अरे बाबांनो, मला अ‍ॅम्बेसेडरपासून या गाडीपर्यंत येण्यासाठी किती वर्षे लागली, हे पाहा... तुम्ही मात्र लगेच कशाकाय गाड्या बदलता... हे असे सांगण्यामागे देखील त्यांची भावना लक्षात घेतली तर लक्षात येईल.

ज्या दिवशी अजित पवार यांचे भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्री होण्याचे नाट्य झाले त्या दिवशी ते दिवसभर वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये ठाण मांडून बसले होते. तेथे खानपान व्यवस्था सांभाळणारे सुधाकर शेट्टी मला म्हणाले देखील, 'सकाळपासून साहेबांनी जेवणही घेतलेले नाही. सतत फोनवर आहेत... बोलत आहेत, लोकांना भेटत आहेत...' या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांच्यासारख्या उंचीच्या नेत्याकडून काही गुणतरी घेता आले पाहिजेत... त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

Web Title: Sharad Pawar: Diplomatic politician, versatile personality and a lot of leadership!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.