"गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात’’, उत्तम जानकर यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:55 IST2024-12-10T16:53:45+5:302024-12-10T16:55:37+5:30
Uttam Jankar Criticize Gopichand Padalkar : आज मरकडवाडीच्या दौऱ्यावर गेलेल्या गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता माळशिरसमधील आमदार उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात, असा टोला लगावला आहे.

"गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात’’, उत्तम जानकर यांचा टोला
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गाव सध्या देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलेलं आहे. या गावात शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्यापेक्षा भाजपाच्या राम सातपुते यांना अधिक मतं मिळाल्याने उत्तम जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून इव्हीएमवर शंका घेण्यात आली होती. तसेच मतदानाची शहानिशा करण्यासाठी गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र हे प्रयत्न पोलीस प्रशासनाने उधळून लावले होते. तेव्हापासून येथे नेतेमंडळींची ये जा सुरू आहे. दरम्यान, आज मरकडवाडीच्या दौऱ्यावर गेलेल्या गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता माळशिरसमधील आमदार उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच गोपिचंद पडळकरांसारखे पाच उंदीर शरद पवार नाश्त्यात खातात, असा टोला लगावला आहे.
मरकडवाडीमधील आंदोलन शरद पवार यांनी हायजॅक केलं, असा आरोप गोपिचंद पडळकर यांनी केला होता. त्याबाबत टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये उत्तम जानकर म्हणाले की, असे बारके चिरके लोक तिथे जाऊन शरद पवार यांच्यावर टीका करणं म्हणजे त्यांच्याबाबत काय बोलणार. अशा उंदरांचा सुळसुळात झालाय. पण अशी पाच उंदरं शरद पवार नाश्त्याला खातात, त्यामुळे अशा पाच उंदरांबाबत तिथे काही फार मोठा फरक पडणार नाही.
यावेळी उत्तम जानकर यांनी पराभूत उमेदवार राम सातपुते यांनाही आव्हान दिले. ते म्हणाले की, राम सातपुते यांच्याकडे आता महिनाभरात आमदार होण्याची संधी आहे. राम सातपुते यांनी माझ्यासोबत निवडणूक आयोगाकडे यावं. इथलं मतदान चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे इथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करावी. म्हणजे राम सातपुते यांना २०२९ वाट बघण्याची आवश्यकता नाही. महिनाभरातच त्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळेल. राम सातपुते यांनी केवळ माझ्यासोबत निवडणूक आयोगाकडे यावं, मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे, असं आव्हानही यावेळी उत्तम जानकर यांनी दिलं.