कोटा ठरवूनही राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्त कसं, नक्की काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:42 AM2022-06-11T11:42:36+5:302022-06-11T11:44:41+5:30
शिवसेनेच्या उमेदवाराचा दोन मतांनी पराभव
Prafulla Patel Sharad Pawar Rajya Sabha Elections 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे तीन तर भाजपाचे दोन उमेदवार यांचा विजय निश्चित होता. पण सहाव्या जागेसाठी शिवसेना विरूद्ध भाजपा अशी लढत रंगली. त्यात भाजपाच्या धनंजय महाडिक यांना ४१ तर शिवसेनेच्या संजय पवार यांना ३९ मते मिळाली. त्यामुळे भाजपाचा विजय झाला. अंतिम निकालानंतर अपक्ष आमदारांची काही मते भाजपाने आपल्याकडे वळवल्याचे निष्पन्न झाले. पण त्यासोबतच आणखी एक गोष्ट निदर्शनास आणली गेली, ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना मिळालेले जास्तीचे १ मत .... यावरून बरीच चर्चा रंगली आणि अखेर त्या चर्चांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.
A huge thank you to all my supporters and well wishers for electing me to serve as the Rajya Sabha Member of the Parliament. I express my heartfelt gratitude to Hon'ble Pawar Saheb and NCP for entrusting me with this responsibility. @PawarSpeaks@NCPspeaks#RajyaSabhaElectionspic.twitter.com/WTyuqB3SiX
— Praful Patel (@praful_patel) June 10, 2022
नक्की काय घडलं?
राष्ट्रवादी पक्षाने आपले अधिकृत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना ४२ मतांचा कोटा नक्की केला होता. त्यानंतर असलेली मते संजय पवार यांना देण्यात येतील असं प्लॅनिंग मविआच्या बैठकीत झाल्याची चर्चा होती. पण निकालाअंती राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना ४३ मतं मिळाल्याचे दिसले आणि त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. ४२ चा कोटा ठरवूनही राष्ट्रवादीच्या एका आमदाराने शब्द फिरवला का? अशी चर्चा रंगली.
चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला ठरलेल्या मतापेक्षा एक मत जास्त मिळाले. यावरून जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की हे १ जास्तीचे मत राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाही. ते मत एका अपक्ष आमदाराचे आहे. त्या आमदाराने पवार यांना याबद्दल आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना एक ज्यादा मत मिळाले याचे आश्चर्य नाही.
"चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी..."; शरद पवारांचे सूचक वक्तव्य#SharadPawar#DevendraFadnavis#RajyaSabhaElections2022#Maharashtra#Shivsena#BJP#NCPhttps://t.co/GhAItJVSQd
— Lokmat (@lokmat) June 11, 2022
राष्ट्रवादीने ते मत शिवसेनेच्या उमेदवाराकडे का फिरवलं नाही?
पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर, त्या अपक्ष आमदाराचं मत शिवसेनेकडे का फिरवण्यात आलं नाही? असा सवाल करण्यात आला. त्यावरही पवारांनी उत्तर दिले. ज्या अपक्ष आमदाराने राष्ट्रवादीला मत देण्याची इच्छा दर्शवली होती, त्याचं मत शिवसेनेला जाणं शक्य नव्हतं. कारण तो अपक्ष आमदार विरोधी गटातील होता. मी त्या अपक्ष आमदाराला सांगितलं असतं तर त्याने शब्द मोडला नसता. पण मी त्यात पडलो नाही. त्यामुळे अपक्ष आमदाराने प्रफुल्ल पटेल यांना मत दिल्याने त्यांचा आकडा एक मताने जास्त दिसला असे शरद पवारांनी स्पष्ट केले.