"मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद"; शरद पवार म्हणाले, "उमेदवार दिले असते तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:51 PM2024-11-04T14:51:44+5:302024-11-04T14:52:10+5:30

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे.

Sharad Pawar expressed his happiness over the decision to withdraw from Manoj Jarnge Patil from the Assembly elections | "मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद"; शरद पवार म्हणाले, "उमेदवार दिले असते तर..."

"मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद"; शरद पवार म्हणाले, "उमेदवार दिले असते तर..."

Sharad Pawar on Manoj Jarnge Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. रविवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांनी १३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. राज्यांनी ज्या मराठा बांधवांनी अर्ज दाखल केलं, त्यांनी अर्ज मागे घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवार देण्याबाबत मित्र पक्षांची यादी आली नसल्याने आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मुंबई पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं. "तिसऱ्या आघाडीचा कुणाशी काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. आनंदीत होण्याचे एकच कारण आहे की, ते सतत सांगत आहेत की भाजप हाच आमचा विरोधक आहे. उमेदवार दिले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

"मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. माझ्याकडे रात्री साडेतीन वाजता उमेदवारांची यादी होती. मात्र, मित्र पक्षांनी त्यांची यादी पाठवली नाही. त्यामुळे एका जातीवर कसे लढणार? त्यामुळे नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागणार आहे. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही," असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. तसेच महाविकास आघाडी असो की, महायुती असो, दोन्ही कडचे नेते हे सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणालाही निवडून आणा, असे देखील म्हणत नाही. केवळ माझे आंदोलन सुरू राहणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
 

Web Title: Sharad Pawar expressed his happiness over the decision to withdraw from Manoj Jarnge Patil from the Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.