Sharad Pawar: पुढील पाच वर्षेही महाविकास आघाडीचीच सत्ता; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 08:35 AM2022-05-15T08:35:23+5:302022-05-15T08:38:51+5:30
राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊन आमच्याकडे काही मते शिल्लक राहणार आहेत. उरलेल्या मतांमधून आम्ही युवराज संभाजीराजेंना मदत करू, असे शरद पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बसून निर्णय घेतील. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे तर पूर्ण करीलच; परंतु, पुढील पाच वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.
पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक असून तो कमी करण्याची गरज आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमती, महागाई वेळीच रोखली नाही तर त्याचे परिणाम वेगळे असतील, असेही पवार म्हणाले. भाजपचे चंद्रकांत पाटील, नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात. ते आम्ही एन्जॉय करतो, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने आगामी निवडणुका एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या, या अनुषंगाने पंधरा दिवसांत निर्णय होईल. वेगवेगळे लढून नंतर एकत्र येणे अथवा एकत्रित मिळून लढणे. त्यावर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
युवराज संभाजीराजेंना मदत करणार
आगामी राज्यसभा सदस्य निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचे प्रत्येकाचे आपले संख्याबळ आहे. त्यात राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊन आमच्याकडे काही मते शिल्लक राहणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडेही मतदान आहे. त्यामुळे उरलेल्या मतांमधून आम्ही युवराज संभाजीराजेंना मदत करू, असे ते म्हणाले.
येचुरींचा फोन आला: देशातील वाढती महागाई व बेरोजगारीच्या अनुषंगाने एक दिशा ठरविण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी माकपा महासचिव सीताराम येचुरी यांचाही फोन आल्याचे पवार म्हणाले.