पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये मोदींचे तीन ट्विटर हँडल; राहुल, सोनिया गांधी 'अनफॉलो'च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 05:06 PM2019-06-29T17:06:22+5:302019-06-29T17:10:41+5:30
काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळजवळ समान आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र सामोरा गेला. मात्र ट्विटवर पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते दिसत नाहीत.
- मोसीन शेख/रवींद्र देशमुख
मुंबई - इंटरनेटच्या क्रांतीनंतर २०१४ पासून सोशल मीडियाने संपूर्ण देश व्यापून टाकला. त्यामुळे संपर्क आणि इतर गोष्टींच्या कक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात रुंदवल्या की, प्रचार आणि प्रसाराचं तंत्रच बदलून गेलं. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल साईट्ने सर्वांना व्यापून टाकले. यामुळे एकमेकांना फॉलो करण्याची संकल्पना समोर आली. त्यातून मग आपल्या आदर्श व्यक्तीला किंवा समविचारी लोकांना फॉलो करण्याचा पायंडा पडला. राजकारणात हे मोठ्या प्रमाणात दिसून येते.
राजकीय पुढाऱ्यांना पक्षातील कार्यकर्ते, हितचिंतक, सहकारी फॉलो करत असतात. यामुळे नेत्यांना देखील लाखो कार्यकर्त्यांसोबत एकाचवेळी कनेक्ट राहण्यास मदत होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे सुद्धा आघाडीवर आहेत. पवार यांचे ट्विटरवर लाखो फॉलोवर्स आहेत. परंतु, पवार केवळ १३ लोकांनाच फॉलो करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक असलेले पवार मोदींच्या ट्विटरवरील तीन हँडलला फॉलो करतात. त्याचवेळी शरद पवार यांच्या फॉलो लिस्टमध्ये युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र दिसत नाहीत.
काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळजवळ समान आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र सामोरा गेला. मात्र ट्विटवर पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये काँग्रेसचे एकमेव नेते दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे.
पवार यांना करतात फॉलो
शरद पवार आपल्या ट्विटर अकाऊंटवर १३ लोकांना फॉलो करतात. यातील चार जण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. यामध्ये मोदींच्या तीन ट्विटर हँडलसह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, हिलेरी क्लिंटन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा समावेश आहे.