चीनप्रश्नी शरद पवारांनी केली केंद्र सरकारची पाठराखण; हे संरक्षणमंत्र्यांचे अपयश नव्हे...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 02:44 AM2020-06-28T02:44:42+5:302020-06-28T02:45:03+5:30
चीनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते.
सातारा : भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेला संघर्ष, हे केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचं अपयश आहे, असे म्हणता येणार नाही, असे निसंदिग्धपणे सांगून राष्ट्राच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चीनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. गलवान परिसरात भारत रस्ता तयार करतोय. सियाचीन भागातील दळण-वळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना वारंवार घडतात; परंतु १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार केला होता. सध्याच्या परिस्थितीत देखील कुठेही दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले नाही. हाणामारीचे प्रकार घडले, असे म्हणत पवार यांनी यावरुन कुणी सरकारला लक्ष्य करू नये, असे सांगितले.
गोपीचंद पडळकर यांच्या त्या टीकेला फार काही महत्त्व द्यावे आणि त्याला उत्तर द्यावे, असे वाटत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही काम राहिलेले नाही, ते दुर्लक्षित आहेत. माझ्यावर टीका करून ते प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत,’ अशी शेलकी टीकाही त्यांनी केली. फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कोणताही आधार नाही. काहींना आता खूप वेळ आहे. त्यांना काम नाही आणि सध्या काही करण्यासारखेही नाही, असा टोला त्यांनी लगावला.