Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी शरद पवारांनी दिला संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:07 AM2022-05-17T00:07:26+5:302022-05-17T00:07:34+5:30
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी संभाजीराजेंच्या विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.
मुंबई/नांदेड - राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची मुदत संपुष्टात आल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याती तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी संभाजीराजेंच्या विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.
शरद पवार म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात. आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अरिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.
सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे विजयी उमेदवारांना लागणारी मतं वगळता २७ मते अतिरिक्त आहेत. त्याशिवाय काही अपक्षांचीही मते महाविकास आघाडीकडे आहेत. अशा प्रकारे सर्व मतांची गोळाबेरीज करून शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळे संभाजीराजे राज्यसभेवर सहज जाऊ शकतात. एकूण सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत मविआ ३ आणि भाजपाचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. आता भाजपाने तिसरा उमेदवार दिल्यास या निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते. तर मविआने तीन आणि भाजपने दोनच उमेदवार दिले तर मात्र संभाजीराजे सहजपणे राज्यसभेवर निवडून जातील.