'शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व'- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 12:21 PM2021-12-12T12:21:09+5:302021-12-12T12:21:16+5:30
'शरद पवार यांच्याशिवाय महाविकास आघाडी शक्य नव्हती.'
मुंबईः आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांचा 81वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनीही शरद पवारांना वाढविसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यशवंतरावानंतर शरद पवार
शरद पवार यांना शुभेच्छा देताना संजय राऊत म्हणाले, 81 वर्षांनंतरही शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, असं राऊत म्हणाले.
'गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती'
आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्त संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असं ते म्हणाले.