शरद पवारांनी आधीच फडणवीसांना 'कात्रजचा घाट' दाखवला होता, आता 'काशीचा घाट' दाखवतील - नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:07 PM2022-01-17T18:07:55+5:302022-01-17T18:08:36+5:30
Nawab Malik : याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत विधान करणारे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.
दुसरीकडे, पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करताना हे विसरले की त्यांच्याच केंद्र सरकारकडून शरद पवार यांना पद्म पुरस्कार दिला होता, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
दरम्यान, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावे लागते. पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही, अशी बोचरी टीका भाजपाचे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले होते.