शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचाच होता, तर पाच वर्षं का थांबले?- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 03:38 PM2019-12-04T15:38:10+5:302019-12-04T15:40:06+5:30
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी संजय राऊतांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आपल्या भाषणांनी संजय राऊतांनी भाजपालाही जेरीस आणलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं संजय राऊतांची मुलाखत घेतली आहे.
यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपाला जेव्हा शरद पवार स्वतःहून ऑफर देतात, तेव्हा ती महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी भाजपा किती उतावळी होती हेच यातून दिसून येतं. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत अगदी प्रधान मंत्र्यांपर्यंत यातून स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही एका बाजूला सांगत होता, आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही सरकार बनवणार नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावली, मग तुम्ही अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न केलात. आणि तेही जमलं नाही, तेव्हा तुम्ही शरद पवारांवर अशा प्रकारचं जाळं फेकत होतात, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणतात, तेसुद्धा यशस्वी झालं नाही. यातून एक स्पष्ट आहे, महाराष्ट्रातली सत्ता आम्ही शिवसेनेच्या हाती लागू द्यायची नाही, असाच त्यांचा उद्देश होता. अडीच अडीच वर्षं 50-50 नंतर पलटी मारली. शरद पवारसुद्धा चालतील, इतर कोणीसुद्धा चालतील. शिवसेना नको, हा एक संदेश यातून स्पष्ट झाला. शरद पवारांनी हा डाव उधळून लावला. ते काही त्यांच्या झाशामध्ये आले नाहीत. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा जर घ्यायचाच होता. तर पाच वर्षं का थांबले. याआधीसुद्धा शरद पवार विरोधी पक्षात होते, अनुभव त्यांचा तोच आहे. व्यक्ती तीच आहे. पण आता सरकार स्थापनेसाठी गरज लागते आहे म्हणून त्यांच्या अनुभवाचा केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांना फायदा घ्यायचा होता, हे जनतेला कळत नाही काय?, त्यावरती फार बोलणं आवश्यक नाही. सरकारच्या स्थिरतेबद्दल अजिबात शंका वाटत नाही. शरद पवार यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचं वागणं सहन करणार नाही. जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे आपण शिवतीर्थावरच्या शपथविधीदरम्यान पाहिल्या आहेत. ग्रामीण भागात जाऊन पाहा.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं जनतेला खूप आनंद झालेला आहे. विरोधासाठी विरोध हे शिवसेनेचं धोरण कधीही नव्हतं. एखादी गोष्ट राष्ट्रीय हिताची असल्यास शिवसेनेनं अनेकदा विरोधाची भूमिका सोडलेली आहे. सरकारमध्ये असतानाही ज्या भूमिका पटलेल्या नाहीत, त्यांना आम्ही विरोध केलेला आहे. राष्ट्र आणि राष्ट्राची जनता ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक राज्याची यासंदर्भातली भूमिका वेगळी आहे. आसाममध्ये भाजपाचं सरकार आहे, पण त्यांची या प्रकरणातली भूमिका वेगळी आहे. निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात. मला वाटत नाही अशा प्रकारची मागणी कोणी फार गांभीर्यानं केली असेल. संघटनांवर बंदी घालून प्रश्न सुटत नाहीत आणि विचार मरत नाहीत. कोरेगाव-भीमाप्रकरणी जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री घेतील. सनातनवरील बंदीनं प्रश्न सुटणार नाहीत. विचार मरणार नाहीत.