शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी...; उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 08:59 AM2023-05-08T08:59:59+5:302023-05-08T09:01:00+5:30
नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते असा दावा ठाकरे गटाने केला.
मुंबई - शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला अशा शब्दात सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
त्याचसोबत नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच’, असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे असं सांगत ठाकरे गटाने अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे.
शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले.
हे झाले महाराष्ट्रातले, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.
पवार यांनी जे राजीनामा नाटय़ केले ते ‘नौटंकी’ होते, अशी टीका भाजपने केली. भारतीय जनता पक्ष हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे.
इतरांवर ‘नौटंकी’ असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळय़ात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. देशाच्या राजकारणाची ‘नौटंकी’ करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार.
भाजपची पोटदुखी अशी की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली.
पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पक्षाच्या प्रमुख पदावरून निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्राच्या राजकारणास विजेचा झटका बसला.
जिल्हा, तालुका स्तरातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते राजीनामा मागे घेण्याच्या हट्टावर कायम राहिले. पवारांच्या घरासमोर, कार्यालयासमोर झुंडी जमल्या. याचा अर्थ असा की, पुढारी म्हणजे पक्ष नाही. त्यांचे पर्यटन सुरूच असते. कार्यकर्ता म्हणजेच पक्ष. शिवसेनेच्या बाबतीत तेच दिसले.
मिंधे गटाबरोबर आमदार-खासदार गेले, पण निवडणूक आयोगाने पक्ष त्यांना देऊनही त्यांचा तंबू रिकामाच राहिला आहे. राष्ट्रवादीचेही तेच घडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत.
भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरडय़ावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळे भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे.
भारतीय जनता पक्षाच्या घरास दरवाजा काय, साधा पडदाही नाही. कोणीही आत घुसतो आहे. नैतिकता व नीतिमत्ता औषधालाही उरलेली नाही. आज सीबीआय, ईडीच्या भयाने भाजपात प्रवेश करून तात्पुरता दिलासा मिळेल. पण डोक्यावरची तलवार लटकती ठेवूनच पुढे जगावे लागेल.
स्वतःस तालेवार-मातब्बर वगैरे समजणाऱ्यांना हे समजत नसेल तर आजपर्यंतचे त्यांचे वागणे, बोलणे, डोलणे फुसकेच होते असेच मानायला हवे. भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही