झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत शरद पवारांच्या केंद्रासमोर अटी; म्हणाले,"घरात आणि ऑफिसमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:35 PM2024-09-12T18:35:29+5:302024-09-12T18:40:33+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाची झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत शरद पवार यांनी काही अटी ठेवल्या आहेत.
Sharad Pawar on Z Plus Security : केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. सुरक्षा पुरवण्यासाठी दिल्लीत काही अधिकारी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र आता शरद पवार यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली होती. मात्र आता शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र शरद पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे.
शरद पवार यांना देण्यात येणाऱ्या केंद्राच्या झेड प्लस दर्जाच्या सुरक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, या बैठकीत शरद पवार यांनी केंद्र सरकारला अटींचं पत्र दिलं. या अटी आणि शर्थिंचे पालन केलं तरच केंद्र सरकारची सुरक्षा घेण्याबाबत विचार करु असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं. याआधीही केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारण्याचे कारण शरद पवारांनी सांगितले होते. मात्र आता यावेळी शरद पवार यांनी काही अटी शर्थी घालून सुरक्षा घेण्यासंदर्भात भाष्य केलं आहे.
शरद पवार यांनी घातलेल्या अटींमध्ये केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार, कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार, याशिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार यांचा समावेश आहे. यासह काही अटी शर्थींचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले आहे. या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, नुकतीच केंद्र सरकारने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकारी सकाळीच शरद पवार यांच्या घरी दाखल झाले होते. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. मात्र सुरक्षा घेण्याच्या समस्येवर कोणताही तोडगा निघाला नाही. आपल्याविरुद्ध कोणत्या प्रकारचा धोका आहे हे आपण आधी तपासू, त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात त्यांनी गृह मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांकडून माहितीही मागवली होती.
याआधी शरद पवार यांनी या सुरक्षेसंदर्भात भाष्य केलं होतं. "गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी,” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.