शरद पवार आजारी, बोलताना होतोय त्रास; पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:20 IST2025-01-25T16:19:49+5:302025-01-25T16:20:01+5:30
Sharad Pawar health Update: शरद पवार हे ८४ वर्षांचे आहेत. ते सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये पवारांना बोलण्यास त्रास होत होता.

शरद पवार आजारी, बोलताना होतोय त्रास; पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द
राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली आहे.
शरद पवार यांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, पक्षाकडून कळविण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पवार हे सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये पवारांना बोलण्यास त्रास होत होता. यामुळे पवारांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याचे समजते आहे.
शरद पवार हे ८४ वर्षांचे आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन वर्षांपूर्वी दोन गट झाले. अजित पवारांनी आपला पक्ष हा राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आणि शरद पवार वेगळे पडले. यानंतर आलेल्या लोकसभेत शरद पवारांनी जोरदार मुसंडी मारली. विधानसभेला मात्र पवारांना फारसे काही करता आले नाही. अजित पवार गट प्रबळ ठरला. यानंतरही शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवारांनंतर आपला नेता कोण, असा प्रश्नही त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. याचा फायदा अजित पवारांना विधानसभेला झालेला पहायला मिळाला.
विधानसभेतील पराभवानंतरही शरद पवार यांनी पक्ष बांधणाला सुरुवात केली आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामुळे शरद पवार त्यांचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दौरे करत आहेत. विधानसभेला पराभव आल्याने अनेक नेते बिथरलेले आहेत. त्यांना भविष्याची चिंता आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जर पक्षाला ताकद मिळाली नाही तर अजित पवार गटच यापुढे प्रबळ मानला जाणार आहे.
Sharad Pawar is having difficulty speaking due to cough. Therefore, he is facing difficulty in giving speeches in the program. Due to this reason, all his programs for the next 4 days have been cancelled: NCP(SCP)
(File photo) pic.twitter.com/8mo7McQx5z— ANI (@ANI) January 25, 2025