विदर्भात भाजपला धक्का देण्यासाठी शरद पवार वापरणार 'माया'(वी) शक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:45 PM2018-08-06T14:45:49+5:302018-08-06T14:47:43+5:30
कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवी दिल्ली : आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला धक्का देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी एक घोषणा करून सगळ्यांना चकित केलं आहे. कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात आहे. विदर्भात त्यांना कार्यकर्त्यांची म्हणावी तशी फळी उभारता आलेली नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. काँग्रेससोबत आघाडी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता पवारांना लोकसभेसाठी हवे असलेले संख्याबळ गाठणे कठीण जाणार आहे. यामुळे पवार यांनी विदर्भात ताकद वाढिवण्यासाठी मायावती यांच्या बसपची साथ घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये देवेगैाडा यांच्या जेडीएसने बसपशी युती केली होती. तेथील त्रिशंकू स्थितीनंतर काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनाही विदर्भामध्ये बसपच्या मायावी शक्तीची मदत घ्यावीशी वाटू लागली आहे. विदर्भामध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची ताकद आहे. त्यांना शह द्यायचा असेल तर काँग्रेससोबतच बसपचीही मदत घ्यायची तयारी पवार यांनी दर्शविली आहे. बसपच्या सुप्रिमो मायावती यांच्याशी याबाबत अद्याप चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मायावती यांना आपण नुकतेच भेटलो, त्यांनी यावेळी उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांशी असलेल्या युतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच इतर राज्यांतही अशा प्रकारची युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याचे पवार यांनी सांगितले. यावर महाराष्ट्रात राष्ट्रवादी बसपला सोबत घेवून लढेल का, यावर छेडले असता, मायावती यांच्याशी अद्याप यावर चर्चा झालेली नाही. मात्र, बसपशी आघाडी झाल्यास आनंदच होईल असे सांगतानाच प्रामुख्याने विदर्भात त्याचा मोठा फायदा होईल, असे शरद पवार यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विदर्भामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत.