शरद पवारांच्या हस्ते होणार नाट्य संमेलनाचे उद्घाटन

By admin | Published: January 21, 2015 12:30 AM2015-01-21T00:30:19+5:302015-01-21T00:30:47+5:30

मोहन जोशी : बेळगावात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान आयोजन; समारोपसाठी प्रभू, गडकरी येणार

Sharad Pawar to inaugurate the Natya Sammelan | शरद पवारांच्या हस्ते होणार नाट्य संमेलनाचे उद्घाटन

शरद पवारांच्या हस्ते होणार नाट्य संमेलनाचे उद्घाटन

Next

बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९५ वे नाट्य संमेलन बेळगाव येथे ६ ते ८ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. येथील सी. पी. एड्. मैदानावर उद्घाटन सोहळा रंगणार असून, शनिवारी (दि. ७) नाट्य संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. समारोपप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व दीपक करंजीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जोशी म्हणाले, १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान संमेलनपूर्व नाट्य महोत्सव सुरू होणार आहे. यामध्ये विविध नाटके सादर केली जाणार आहेत. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी संमेलनाला प्रारंभ होणार आहे. शनिवारी (दि. ७) शहरातील प्रमुख मार्गांवरून नाट्य दिंडीचे आयोजन केले आहे. दिंडीत २०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. दिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर बेळगावातील तीन ठिकाणी कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या जिरगे सभागृहात पुरस्कारप्राप्त दहा एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. लोकमान्य रंग मंदिरात ‘नादखुळा’ लावणी कार्यक्रम होणार आहे. नंतर नाट्य संमेलनाध्यक्षा फैय्याज खान यांच्यासह मान्यवरांचा सहभाग असलेला संगीत कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी सी.पी.एड्. मैदानावरील मुख्य रंगमंचावर ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाट्य सादर होणार आहे. रविवारी (दि. ८) संमेलनाचा समारोप होणार असून, श्रीरंग गोडबोले हे ‘१०० वर्षांची रंगभूमीची वाटचाल’ उलगडून दाखविणार आहेत. संमेलनस्थळी १०० स्टॉल मांडण्यात येणार आहेत. स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली. यावेळी स्थानिक शाखा अध्यक्षा वीणा लोकूर, राजू सुतार, नीना जठार, गीता कित्तूर, सुनीता पाटणकर, डॉ. नीता देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Sharad Pawar to inaugurate the Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.