शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:30 PM2024-04-30T16:30:14+5:302024-04-30T16:31:32+5:30
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुरातील सणसर इथं आयोजित सभेत जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jayant Patil ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यातील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत," असा पलटवार जयंत पाटलांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुरातील सणसर इथं सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते.
नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "आता काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्या सभेत त्यांनी पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली. पण नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहे. आदरणीय पवार साहेबांवर बोलण्याव्यतिरिक्त या पंतप्रधानांना काहीच जमत नाही. आपलं काम सांगायचं तर पंतप्रधान जाईल तिथे विरोधकांवर टीका करत आहेत. आम्ही अनेक पंतप्रधान पाहिले पण कोणत्याही पंतप्रधानाने विरोधकांवर अशी टीका केली नाही. हे नरेंद्र मोदी यांना शोभतंय असं वाटत नाही. ही निवडणूक खूप वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांना काहीही करून ही निवडणूक जिंकायची आहे. म्हणून साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर होत आहे. त्यांच्या घौडदौडीला शरदचंद्र पवार साहेब लगाम लावत आहेत. म्हणून ते सतत पवार साहेबांवर टीका करत आहेत," अशा शब्दांत पाटील यांनी मोदींनी उत्तर दिलं.
"४०० पार करू असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींच्या तोंडून आता ४०० हा शब्द देखील निघत नाही. कारण त्यांना कळून चुकले आहे की, त्यांच्या आता २०० वरही जागा येत नाही," असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.
अमित शाह यांच्यावरही निशाणा
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. "शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केले? हा प्रश्न महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी आम्हाला विचारू नये. त्यांनी गुजरातमध्ये काय केले हे सांगावे. देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर इतकी नाराज आहे की, लोक भाजपच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना गावात फिरू देत नाहीत," असं पाटील म्हणाले.
दरम्यान, "सुप्रिया सुळे यांना तुम्ही गेली १०-१५ वर्ष सतत निवडून देत आहात आणि त्या देखील तुमचे प्रश्न अत्यंत तळमळीने संसदेत मांडतात. प्रश्न संसदेत मांडले की सुटतात. त्याची नोंद घेतली जाते आणि प्रश्न सोडवणुकीस गती येते. आपला खासदार बोललाच पाहिजे. आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सुप्रियाताईंना निर्भीडपणे मतदान करा," असं आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केलं आहे.