"ही काय परिस्थिती निर्माण केलीये? महाराष्ट्रातला शेतकरी इतका..."; जयंत पाटलांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:41 IST2025-04-12T09:40:44+5:302025-04-12T09:41:35+5:30

Jayant Patil on Farmer Suicides in Maharashtra: "कर्जमाफी ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्यानेही ओळखलंय"

Sharad Pawar led Jayant Patil slammed Mahayuti saying What kind of situation is this as Farmers in Maharashtra ending lives due to no money loan waiver | "ही काय परिस्थिती निर्माण केलीये? महाराष्ट्रातला शेतकरी इतका..."; जयंत पाटलांचा सरकारला सवाल

"ही काय परिस्थिती निर्माण केलीये? महाराष्ट्रातला शेतकरी इतका..."; जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Jayant Patil on Farmer Suicides in Maharashtra: बेभरवशी निसर्ग, शेतीमालाचे पडलेले भाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि संसारगाडा चालविण्याच्या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांचे सत्रच सुरू आहे. २०१४ पासून गेल्या बारा वर्षांत जिल्ह्यात तब्बल १ हजार ५७३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून एक लाखाचा धनादेश देऊन तोंडाला पाने पुसण्यात येतात; परंतु या कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी या तुटपुंज्या मदतीत कशी भरून निघणार. त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने छदामही दिला नाही हे वास्तव आहे. याच साऱ्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

जयंत पाटील ट्विट करून म्हणाले, "नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते, त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत असे ते म्हणाले. कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय?"

"एकाबाजूला श्रीमंत धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब १ - २ लाखांच्या कर्जपायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व. हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळाला पाहिजे," अशी मागणीही जयंत पाटलांनी केली.

Web Title: Sharad Pawar led Jayant Patil slammed Mahayuti saying What kind of situation is this as Farmers in Maharashtra ending lives due to no money loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.