"महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे; सरकार अडचणीत आले की काही वकील कोर्टात जातात"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:43 PM2024-08-24T14:43:01+5:302024-08-24T14:43:53+5:30

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघाती आरोप

Sharad Pawar led NCP Jayant Patil said Maharashtra Government Law and Order Deteriorates | "महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे; सरकार अडचणीत आले की काही वकील कोर्टात जातात"

"महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे; सरकार अडचणीत आले की काही वकील कोर्टात जातात"

Jayant Patil on Protest: राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या घटना तसेच बदलापूरमधील शाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि इतर पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून तोंडाला काळी फित बांधून निषेध केला. यावेळी बोलताना, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे गेल्याची टीका त्यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. सरकारचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक घाबरत आहेत. महाराष्ट्र बंदबाबत कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचे आम्ही पालन केले. कोर्टाचा अवमान होणार नाही याची काळजी आम्ही घेतली. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात महिला, लहान मुले आणि सुजाण नागरीक एकत्र येऊन बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करत आहे. पुढे अशा घटना होऊ नये अशी मागणी आम्ही करतो."

"सरकारी खर्चातून वेगवेगळ्या इव्हेंट, प्रचाराच्या कार्यक्रमासाठी पोलिसांना राबवले जात आहे. झालेल्या गुन्ह्य़ांची नोंद करण्यासाठी, त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना वेळ मिळत नाही. बदलापूरच्या घटनेत १२ तास गुन्हा नोंद करण्यासाठी लागले, या एवढ्या वेळात पुरावे नष्ट होण्याची भीती असते. ठाणे जिल्ह्यातील नेमलेले पोलीस अधिकारी हे मुख्यमंत्र्यांच्या शिफारशी नुसार नेमलेले आहेत. त्यामुळे ताबडतोब कारवाई केली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी वाट पाहली जाते असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. पोलीस खात्याचे काम व्यवस्थित होत नाही. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे जात आहे. पैसे सरकारच्या इव्हेंटबाजीमध्ये वापरले जातात पण महिलांच्या सुरक्षेसाठी वापरले जात आहे. सरकारला काही भान नाही, आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे," असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

"बदलापूर येथे घडलेल्या घृणास्पद घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र सरकार अडचणीत आले तर काही लोक लगेच कोर्टात धाव घेतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्र बंद विरोधात काही लोकांनी काल कोर्टात धाव घेतली. ही तीच लोकं आहे जी मराठा आरक्षणादरम्यानही कोर्टात गेली होती. जेव्हा जेव्हा हे सरकार अडचणीत येते तेव्हा ठराविक वकील त्यांना सावरण्यासाठी पुढे येतात. हे नेक्सस नक्की काय आहे?" असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Sharad Pawar led NCP Jayant Patil said Maharashtra Government Law and Order Deteriorates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.