निराशाजनक, नकारात्मक अन् नाविन्य नसलेला अर्थसंकल्प; जयंत पाटलांची तिखट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 03:21 PM2024-02-01T15:21:11+5:302024-02-01T15:21:51+5:30
"आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक"
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच, अर्थसंकल्पामधून चार जातींच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे अर्थमंत्री वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. मात्र, हा अर्थसंकल्प निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असल्याची तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
"केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो. या अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही," असा टोलादेखील जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांनी सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो. अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 1, 2024
हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा
"प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही आशा मावळली आहे. कष्टकरी मजूर, त्यांच्या कुटुंबासाठी सरकारने मदत केली नाही. केंद्रीय अर्थमंत्री दिवा स्वप्ने दाखवत आहेत. आत्मस्तुतीने भारावलेले केंद्रीय अर्थमंत्र्याचे भाषण अच्छे दिन प्रमाणे आभासी होते. पंतप्रधानांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. हे स्वप्न जसे भंगले तसेच हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा, जुन्या कढीला नव्याने ऊत आणणारा आहे", अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.