"कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला आहे का?"; जयंत पाटलांचा सरकारला संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:38 PM2023-10-16T15:38:40+5:302023-10-16T15:39:35+5:30
Bridge Collapse: सोमवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला
Mumbai Goa Highway Bridge Collapse: मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची दुरावस्था या नेहमीच चर्चेचा विषय असतो. या रस्त्यांवरील खड्डे, त्यांचा दर्जा याबद्दल कायमच टीका केली जाते. तशातच आज या महामार्गावर चिपळूणजवळ एक मोठी घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले होते. त्यात आज सकाळी पुलाच्या गर्डरचा भाग मधोमध तुटला आणि त्यातला काही भाग रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला दर्जाबाबत खुलासा करण्यास सांगितला आहे.
जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे, "मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासीयांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा."
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाला आहे. पुलाच्या गर्डरचा काही भाग कोसळला. पुलाचा काही भाग कोसळला तो थेट खालच्या रस्त्यावर कोसळला. सुदैवाने जेव्हा ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर कोणीही पुलाखाली नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. अशातच हा प्रकार घडल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.