Rajya Sabha Election 2022 BJP vs NCP: घोडेबाजाराला खतपाणी घालणे ही भाजपाची परंपरा; राष्ट्रवादीच्या प्रवक्तांनी केला हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:34 PM2022-06-07T18:34:32+5:302022-06-07T18:35:49+5:30
राज्यसभा निवडणूक जवळ येताच हालचालींना वेग
Rajya Sabha Election 2022 BJP vs NCP: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी येत्या १० तारखेला मतदान पार पडणार आहे. सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी होणारी निवडणूक चुरशीची असेल असा अंदाज आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. वर्षा बंगल्यावर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांची बैठक घेतली. तसेच घोडेबाजाराची शक्यता असल्याने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आमदारांच्या राहण्याची सोय केली जाणार असल्याचे बोलले जात आहेत. तशातच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
'घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपाची असून राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील', असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला. 'महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी मुद्दामहून सातवा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा प्रयत्न भाजपचा आहे. पण महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील', असेही तपासे म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेची निवडणूक चुरशीची असून प्रमुख चार पक्ष वगळता इतर पक्षातील आमदारांवर सहाव्या उमेदवाराची भिस्त असणार आहे. अशा परिस्थितीत तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. तर, राज ठाकरे सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करणार, असे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे.