Hindutva, BJP vs NCP: "एकीकडे स्वत:चं 'हिंदुत्ववादी सरकार' म्हणायचं नि दुसरीकडे हिंदूच्या मंदिराची..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 04:22 PM2022-12-03T16:22:14+5:302022-12-03T16:24:00+5:30
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीची भाजपावर सडकून टीका
Hindutva, BJP vs NCP: महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेने प्रखर हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली होती, असे सातत्याने भाजपाचे नेतेमंडळी टीका करताना दिसतात. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विचारधारेमुळे शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हिंदुत्वाचा विसर पडला की काय, असेही अनेकदा भाजपाकडून टोले लगावण्यात आले. खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोना काळात मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे कान टोचले होते. मात्र, हिंदुत्वाची भूमिका घेऊन अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारणा केली आहे.
"स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि दुसरीकडे भाजपचा एक आमदार हिंदुच्या मंदिराची जमीन लाटतो असा दोगलेपणा, दुटप्पीपणा फक्त भाजपाच करु शकते," असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हिंदूच्या मंदिराची जमीन लाटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी जोरदार टीका केली.
"भाजपा-शिंदेसरकार हे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणते आणि त्याच सरकारमधील भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला आहे. स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि हिंदूंच्या मंदिराची जमीन लाटायची हा गंभीर प्रकार आहे. हिंदूच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार भाजपच्या नेत्याच्या माध्यमातून झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली पाहिजे, अशी मागणी बीडमधील नागरिकांची आहे. अशा प्रकारची गोष्ट निंदनीय आहे," असेही महेश तपासे म्हणाले.
दरम्यान, बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थानच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. देवस्थानच्या बेकायदा जमीन बळकावल्याचे हे प्रकरण आहे. आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी, भाऊ देविदास तसेच मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान यांच्याविरोधात आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. निराधार तक्रारातील वाक्य रचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. नाव न घेता सुरेश धस म्हणाले, आपल्या जुन्या पक्षातील (राष्ट्रवादी) राज्य व जिल्हा स्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांच्या चौकशीला मी तयार आहे. चौकशीत सहकार्य करणार आहे. लवकरच दूध का दूध - पानी का पानी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.