Nawab Malik ED Custody : "तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा..."; ईडी कोठडीच्या शिक्षेनंतर नवाब मलिकांच्या अकाऊंटवरून ट्वीट; शायरीतून विरोधकांना दिला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:46 PM2022-02-23T21:46:12+5:302022-02-23T21:48:53+5:30
दिवसभराच्या राजकीय नाट्यानंतर नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
Nawab Malik, ED Custody : महाराष्ट्रातील राजकारणात दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी (Enforcement Directorate Custody) देण्याचे आदेश विशेष न्यायालयाने (Special PMLA court) सुनावले. ईडीकडून मलिक यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीचे आदेश देण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित काही लोकांकडून मलिक यांनी कमी दराने कुर्ल्यातील जमिनी विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपा नेत्याकडून करण्यात आला होता. याच संदर्भात ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवाब मलिक हे जरी ईडी कोठडीत असले तरी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास प्रेरणादायी आणि इशारा देणारा एक शेर ट्वीट करण्यात आली आहे.
नवाब मलिक हे जरी ईडी कोठडीत असले तरी दिवसभरात त्यांच्या अकाऊंटवरून त्यांचे जनसंपर्क विभाग (PR) सांभाळणाऱ्यांकडून काही ट्वीट करण्यात आले आहेत. मलिक यांना विशेष न्यायालयाकडून जेव्हा ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर काही वेळातच ही बातमी प्रसारमाध्यमांच्या मार्फत सर्वत्र समजली. त्यानंतर काही वेळातच नवाब मलिक यांच्या अकाऊंटवरून एक शायरी ट्वीट करत भाजपाला इशारा देण्यात आला. 'कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा!!', असं ट्वीट त्यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.
कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !!
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 23, 2022
दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने आज पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सुमारे ८ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर मलिक यांना ईडीने अटक केली. अटकेनंतर मलिक यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून झाल्यावर विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या सर्व घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसले तसेच काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचेही दिसून आले.