BJP vs NCP: "पराभव लपवण्यासाठी भाजपकडून अशा प्रकारची विधानं"; निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:11 AM2022-01-20T11:11:31+5:302022-01-20T11:13:33+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी केलाय सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा
मुंबई: महाराष्ट्रातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यात नगरपंचायतींच्या बाबतीत राष्ट्रवादी तर वैयक्तिक जागांच्या बाबतीत भाजपने पहिला क्रमांक पटकावला. पण वैयक्तिक स्तरावरील जागांच्या बाबतीतही राष्ट्रवादीच अव्वल असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नबाव मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
महाराष्ट्रात नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात ८० टक्के मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. ७५ टक्के जागांवर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला. आम्हाला २७ नगर पंचायतींमध्ये बहुमत मिळालं. इतर १० ठिकाणीदेखील आम्ही इतरांशी हातमिळवणी करून बहुमाताचा आकडा गाठू. संख्याबळाबद्दल बोलायचं झाल्यास निवडणुक आयोगाच्या डेटामध्ये काही चुका आहेत. आज ती चूक सुधारली जाईल. वैयक्तिक जागांच्याबाबतीतही आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. भाजपचे लोक म्हणत आहेत की सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. ही अशी विधानं केवळ स्वत:चा पराभव लपवण्यासाठी केली जात आहेत", असा टोला नवाब मलिकांनी लगावला.
"भाजप म्हणत असेल की या निवडणुकांमध्ये सत्तेचा दुरूपयोग झाला आहे, तर ते थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. निवडणूक सुरू असताना भाजपकडून एकही आरोप करण्यात आला नाही. आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विविध आरोप केले जाऊ लागले आहेत. पराभवाला कसं सामोरं जायचं हे कळत नसल्याने पराभव लपवण्यासाठी भाजपकडून असली विधानं केली जात आहेत", असे नवाब मलिक म्हणाले.
"पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांचा भाचा आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. या छापेमारीची वेळ पाहता हे स्पष्ट होतं की ही धाडसत्र राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. जिथे जिथे निवडणुका असतात तिथे ईडी आणि आयकर विभाग सक्रीय होतो. बंगाल, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र सगळीकडे हेच घडलं. भाजपकडून सरकारी यंत्रणांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला जात आहे. या घटनेनंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे", अशी टीकाही मलिक यांनी केली.