Jayant Patil on MIM Alliance: 'एमआयएम'ला जर महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांना आधी सिद्ध करावं लागेल की..."; राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी घातली 'ही' अट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:32 PM2022-03-19T15:32:37+5:302022-03-19T15:33:55+5:30
'एमआयएम'ला महाविकास आघाडीत येण्याची इच्छा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
Jayant Patil on MIM Alliance: महाविकास आघाडीसोबत येण्याची एमआयएमची तयारी असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. एमआयएम महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार असल्याचा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशा परिस्थितीत, 'आपण भाजपविरोधी आहोत आणि भाजपाला पराभूत करण्यास उत्सुक आहोत हे एमआयएमला कृतीतून सिद्ध करावं लागेल', असं मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
"इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे की राजेश टोपे यांनी तशी चर्चा केलेली नसेल. त्यामुळे या चर्चेबाबत काही वक्तव्य करण्याची सध्या आवश्यकता वाटत नाही. पण आतापर्यंत एमआयएमला भाजपाची बी टीम म्हटलं जात. जर ते बी टीम नसतील तर त्यांना तसं सिद्ध करावं लागेल", असं जयंत पाटील म्हणाले.
"औरंगाबाद महापालिका निवडणुका लवकरच होतील अशी अपेक्षा आहे. त्या निवडणुकीत एमआयएमची भूमिका काय, ते पाहावं लागले. एमआयएम हे भाजपच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की भाजपचा विजय व्हावा म्हणून अप्रत्यक्षपणे मदत करण्यास उत्सुक आहेत? हे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या वेळी स्पष्टपणे कळेल", असे जयंत पाटील म्हणाले.
"इम्तियाज जलील आमच्याही चांगले ओळखीचे आहेत. विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण तरीदेखील मला असं वाटत नाही की राजेश टोपे यांनी त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा केली असेल. एखाद्याच्या घरी दु:खद प्रसंग घडला असेल आणि तेथे भेटायला गेलं तर अशा वेळी राजकीय चर्चा केली जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती नाही", असंही पाटील यांनी स्पष्ट केले.