लोकसभा निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 12:01 PM2018-10-06T12:01:30+5:302018-10-06T13:14:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
आज मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका राष्ट्रीय अध्यक्ष खा. @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येत आहेत. #औरंगाबाद, #रायगड, #मावळ व #पुणे शहर, #शिरूर व #जळगाव च्या बैठका पार पडल्या आहेत. इतर जिल्ह्यांच्या या मॅरेथॉन बैठका दिवसभर चालणार आहेत. pic.twitter.com/sJYxp194tN
— NCP (@NCPspeaks) October 6, 2018
दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता, तसे सूतोवाचही राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले होते. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ घातली असली, तरी राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा सांगितला आहे. परभणी आणि अमरावती या जागांची अदलाबदल करावी, अशी आमची मागणी असल्याचे काकडे यांनी सांगितले. पुणे लोकसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे काँग्रेसकडे आहे. मात्र मागच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पराभूत झाला. येत्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुण्यातून लढावे, असा आग्रह पक्षातून धरला जात आहे. यावर पवारांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. मात्र, ऐनवेळी ते होकार देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखविला.