Sharad Pawar News: हॅलो शरद पवार बोलतोय....! मणिपूरच्या राज्यपालांना फोन; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 05:48 PM2023-05-07T17:48:29+5:302023-05-07T17:49:37+5:30

Sharad Pawar News: कदाचित हा शेवटचा फोन असेल, असे सांगत विद्यार्थ्यांनी पालकांना काहीही करून वाचवण्याची आर्त साद घातली.

sharad pawar make phone call to manipur governor and 10 maharashtra stuck students shifted to safe place from violence | Sharad Pawar News: हॅलो शरद पवार बोलतोय....! मणिपूरच्या राज्यपालांना फोन; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका

Sharad Pawar News: हॅलो शरद पवार बोलतोय....! मणिपूरच्या राज्यपालांना फोन; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका

googlenewsNext

Sharad Pawar News: मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंसाचारादरम्यान, मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी तिकडे अडकून पडले आहेत. यातच आताच्या घडीला राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे राज्यातील काही विद्यार्थ्यांची सुटका करून सुखरूप ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

सांगलीतल्या जत तालुक्यातले काही विद्यार्थी हे मणिपूरमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. जत तालुक्यातल्या आवंडी गावाचे रहिवासी संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरने आपल्या वडिलांना फोन केला. मणिपूरमधील भीषण परिस्थिती सांगितली. चारही बाजूंना गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येत आहेत. आम्हाला येथून  वाचवा. कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, असे सांगितले. मुलाचा अशा प्रकारे फोन येताच वडिलांनी धावधाव करण्यास सुरुवात केली. संभाजी कोडग यांनी बारामतीच्या प्रल्हाद वरेंना फोन केला. मणिपूरच्या दंगलीत महाराष्ट्रातील १० मुले हॉस्टेलवर अडकल्याचे सांगितले. 

काहीही करा, पण त्यांना वाचवा

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना काहीही करून वाचविण्याची विनंती करण्यात आली. ५ मे रोजी आपण शरद पवारांना भेटू असे वरे यांनी संभाजी कोडग यांना सांगितले. मात्र, तोपर्यंत मणिपूरची परिस्थिती अधिक चिघळली. त्यामुळे संभाजी कोडग यांनी शरद पवारांना एवढा निरोप द्या, अशी विनंती केली. प्रल्हाद वरे यांनी शरद पवारांचे खासगी सचिव सतीश राऊत यांना तातडीने संपर्क केला आणि ही परिस्थिती सांगितली. सतीश राऊत यांनी ही सगळी परिस्थिती ऐकली आणि शरद पवार यांना तातडीने हा निरोप दिला.

शरद पवारांनी थेट मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला

शरद पवार यांना माहिती मिळताच, याचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. महाराष्ट्रातील १० मुलांसह दुसऱ्या राज्यातील दोन मुलांना सुरक्षित ठिकाणी न्यावे, अशी विनंती केली. मुलांचे लोकेशन, संपर्क क्रमांक शरद पवारांच्या कार्यालयाकडून पाठवले गेले. यानंतर रात्री १२च्या सुमारास संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरला मणिपूर लष्कराच्या चीफ कमांडरचा फोन आला. आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी नेत आहोत, असे त्याला सांगितले. या १२ विद्यार्थ्यांना रात्रीच सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. 

दरम्यान, एकीकडे शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावरून राजकारण तापलेले होते. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. तर दुसरीकडे, लोकोपयोगी कामे त्यांनी सुरू ठेवली होती, हेच यातून दिसून येत आहे. शरद पवार यांनी तातडीने सूत्रे फिरवत मुलांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था केल्याने या मुलांच्या पालकांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.

 

Web Title: sharad pawar make phone call to manipur governor and 10 maharashtra stuck students shifted to safe place from violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.