शरद पवार म्हणजे मंथरा आणि शकुनी मामा; पूनम महाजन यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 10:26 PM2019-02-03T22:26:31+5:302019-02-03T22:28:52+5:30

चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदानावर भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या भाषणामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar is manthara and Shakuni Mama; Poonam Mahajan's controversial statement | शरद पवार म्हणजे मंथरा आणि शकुनी मामा; पूनम महाजन यांचे वादग्रस्त वक्तव्य

शरद पवार म्हणजे मंथरा आणि शकुनी मामा; पूनम महाजन यांचे वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामा आहेत. तर, ममता बॅनर्जी टेरर मेकींग दादा आहेत ज्यांचे कामच अमानुष आहे. अशीच अवस्था अखिलेश यादव, बसपाच्या मायावती यांची आहे. रोज कुत्र्यामांजरासारखे एकमेकांशी भांडणारे आता मोदी नावाच्या सुर्याला रोखण्यासाठी महाआघाडी करत आहेत. ही महा आघाडी म्हणजे महाठगबंधन आहे, अशा शब्दांत भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी देशभरातील विरोधी नेत्यांवर टीका केली. 


चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदानावर भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या भाषणामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यापुर्वीही उत्तर भारतीयांमुळेच मुंबईचा विकास झाला, प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय असल्याची विधाने पूनम महाजन यांनी केली होती. रविवारी सीएम चषक स्पर्धेत बोलताना महाजन यांनी देशपातळीवर महाआघाडीच्या सर्वच नेत्यांना विविध विशेषणे लावत त्यांची खिल्ली उडवली. फक्त आपल्या आईचे ऐकणारे आणि राफेल, राफेल करणारे राहुल गांधी हे राफूल आहेत. तर, प्रियंका गांधी यांची सरचिटणीस पदी नियुक्ती म्हणजे बेटी लाओ और बेटा बचाओ कार्यक्रम आहे. काँग्रेसने प्रियंकाचे इतके फोटो पसरवले की ती तैमूर अली असल्यासारखेच वाटत होते, असे महाजन म्हणाल्या.


देशातील महागठबंधन म्हणजे महा‘ठग’बंधन आहे. कलकत्त्याची टेरर मेकिंग कंपनी म्हणजे ममता बॅनर्जी. माँ माटी मानुषची घोषणा असली तरी त्यांचे वागणे म्हणजे मैं ममता अमानुष असेच आहे. तर, फक्त आपलेच करणाऱ्या आणि ज्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे अशा मायावती, सत्ता मिळाल्यावर वडिलांनाच बाजूला सारणार आणि आता पंक्चर सायकलवर बसलेले अखिलेश यादव महागठबंधनमध्ये आहेत. तर, सगळ्यांचे ऐकल्याचे दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरू करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळाले नाही की इकडचे तिकडे, तिकडचे इकडे करणारे मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहतायत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपाचा कमळच उमलेल असेही महाजन म्हणाल्या. 

Web Title: Sharad Pawar is manthara and Shakuni Mama; Poonam Mahajan's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.