शरद पवार सोनिया गांधींची आज भेट, मुख्यमंत्रीही दिल्ली दरबारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:11 AM2019-11-04T06:11:47+5:302019-11-04T06:11:55+5:30
सेनेला पाठिंबा देण्यावरून पवारांची भूमिका निर्णायक?
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते.
शरद पवार रविवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. यापूर्वी त्यांनी दूरध्वनीवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात पक्षातील नेत्यांच्या मतापेक्षा शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व किंवा विश्वासार्ह मानत असल्याचे समजते.
मुख्यमंत्री आज दिल्लीत
राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीत जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अधिक आणि तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेतील. राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात देखील ते शहा यांच्याशी चर्चा करतील.