शरद पवारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; आठवड्यातील दुसऱ्या भेटीने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 06:14 AM2024-08-04T06:14:17+5:302024-08-04T06:14:37+5:30
या भेटीत विरोधी पक्षाच्या साखर कारखान्यांना नाकारण्यात आलेले कर्ज तसेच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शनिवारी पुन्हा भेट घेतली. आठवड्यात ही दुसऱ्यांदा भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या भेटीत विरोधी पक्षाच्या साखर कारखान्यांना नाकारण्यात आलेले कर्ज तसेच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी शरद पवार यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आरक्षणाबरोबरच साखर कारखान्यांना थकहमी देताना कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. परंतु राज्य सरकारने नुकतीच ज्या कारखान्यांना थकहमी दिली आहे त्यातून शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि विधान परिषदेची निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आले आहे. याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
मराठा आरक्षणासंदर्भात आगामी काळात काही पावले उचलता येतील का, यासंदर्भातदेखील चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.