शरद पवार - नारायण राणे भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:14 PM2018-12-03T19:14:28+5:302018-12-03T19:14:28+5:30
देशाच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून देणारे, राजकारणातील ‘जाणते राजा’ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भेट दिली.
सिंधुुदुर्ग : देशाच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून देणारे, राजकारणातील ‘जाणते राजा’ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भेट दिली. २० मिनिटे राणेंच्या निवासस्थानी आमदार नीतेश राणे व स्वाभिमानच्या प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत त्यांची महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याचा नेमका तपशिल समजू शकलेला नाही.
शरद पवार हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग दौ-यावर त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींसमवेत आले होते. या दौ-यात त्यांच्यासमवेत नातू रोहित, पार्थ, हर्ष पवार हे उपस्थित होते. सोमवारी रत्नागिरी येथे जात असताना त्यांनी कणकवली येथे भेट दिली. तसेच, नारायण राणे यांच्या ओम गणेश या निवासस्थानी ते दुपारी दाखल झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम राणेंच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी शरद पवारांचे राणे कुटुंबीयांनी स्वागत केले.
यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह नीलमताई राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, विकास कुडाळकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, उपसभापती सुचिता दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डान्टस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माझी ही सदिच्छा भेट !
मी सिंधुदुर्गात आलो होतो. नारायण राणे यांनी मला दूरध्वनी केला होता. त्यामुळे मुंबईला जाता जाता त्यांच्या निवासस्थानी मी सदिच्छा भेट दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कारण तशी चर्चा करण्यासारखा विषय माझ्याकडेही आणि राणेंकडेही नाही. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेटच होती, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
राणेंना भेटल्याशिवाय कोणीही कोकण सोडू शकत नाही !
कोकणात राणेंची ताकद संपली, अशी विरोधक टीका करतात. परंतु महाराष्ट्राचे राजकारण नारायण राणेंशिवाय होऊ शकत नाही. कोकणात आलेला प्रत्येक दिग्गज नेता, मुख्यमंत्री असो किंवा अन्य मंत्री हे राणेंना निवासस्थानी भेटतात. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. तरीदेखील राणेंची राजकीय ताकद लक्षात घेऊन त्यांनी भेट दिली. त्यामुळे विरोधकांनी आमच्या राजकीय ताकदीची विचारणा करण्याअगोदर विचार करावा. कोकणात आलेला राजकीय नेता नारायण राणेंना भेटल्याशिवाय कोकण सोडू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या भेटीवर आमदार नीतेश राणे यांनी दिली.
ग्रेट भेटीची उत्सुकता !
नारायण राणे आणि शरद पवार यांची झालेली ही भेट आगामी काळात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे एनडीएत असलेला स्वाभिमान पक्ष भविष्यात महाआघाडीत दाखल होण्याच्या दृष्टीने ही साखरपेरणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विश्वास यात्रेतदेखील स्वाभिमान पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे आगामी राजकीय आखाड्यांची बांधणी करण्याच्या दृष्टीनेच राणे-पवार यांची ही भेट झाली आहे, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. मात्र, या भेटीचा नेमका तपशील समजू शकलेला नसल्याने या ‘ग्रेट भेटी’च्या कारणाची उत्सुकता सगळ्यानाच आहे.