देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला धक्का; राणेंच्या उपस्थितीत शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 01:49 PM2020-08-10T13:49:34+5:302020-08-10T13:55:10+5:30
गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्या पासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत.
मालवण - सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विध्यमान संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत भजापात प्रवेश केला. भाजपाचे जेष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुलाबराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असून राष्ट्रवादी सह सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्राला खिंडार पाडले आहे.
गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्या पासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. आजच्या जिल्हा बँकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीत झालेल्या प्रवेशामुळे जिल्हा बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांना फारमोठा धक्का बसला आहे.
जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांचा मालवण येथील निलरत्न बंगला येथे भाजपा प्रवेश झाला. त्यांचे स्वागत माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा.नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे,आम.नितेश राणे, यांनी पुष्पगुच्छ, भाजपाचा झेंडा देऊन केले. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाअध्यक्ष राजन तेली,आमदार प्रसाद लाड,आमदार भाई गिरकर,आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार,अतुल काळसेकर,अशोक सावंत,दिलीप रावराणे,संजय चव्हाण, राजू राऊळ,सुदेश आचरेकर,महिला जिल्हाअध्यक्ष संध्या तेरसे,मालवण तालुका अध्यक्ष विजय केनवडेकर,आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
आज सकाळीच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपात गेलेले काही नेते पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक आहेत असं विधान केले होते, मात्र सिंधुदुर्गात सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्याला भाजपात प्रवेश देऊन भाजपानेच राष्ट्रवादीला दणका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.