Sharad Pawar: 'साहेब तुम्ही नसाल तर आम्ही कुणाकडे जायचं...', जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:52 PM2023-05-02T13:52:38+5:302023-05-02T13:55:00+5:30
'तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. '
मुंबई- आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.
"पवार साहेब राजीनामा मागे घ्या"; कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती, काही जण रडले, काही पाया पडले!
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, साहेब आपण सर्वांचे अश्रू बघताय, भावनाही बघताय...आपण कार्यकर्त्याचा चेहरा पाहून त्याच्या मनात काय आहे, हे ओळखणारे जादूगार आहात. वय तुमच्यासाठी काही प्रश्न नाही. मी 2004 साली नागपूरमध्ये तुमच्या अंगातून रक्त वाहत असताना प्रचार करताना पाहिलं आहे. त्यापेक्षा आताची तुमची तब्येत खूप चांगली आहे.
संबंधित बातमी- साहेबांच्या निर्णयाची आम्हालाही माहिती नव्हती, आम्हालाही मोठा धक्का- प्रफुल पटेल
अशा अवस्थेत तुम्ही पक्ष सावरला आणि पक्षाला सत्तेत ठेवत आलात. सत्ता ही महत्वाची नाही, पण तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. मी नेहमी तुमचे दर्शन घेतो, पुढचे दहा दिवस आरामात जातात. तुम्ही नसाल तर आमचं जीवनंच व्यर्थ आहे. आता येवढ्या अडचणी समोर असताना आम्ही कोणाकडे जायचं...अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली.