'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 01:52 PM2019-09-20T13:52:52+5:302019-09-20T14:19:33+5:30
1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली, आज मोदी -शहा तेच करत आहेत.
पुणे : मी शरद पवार यांचा वारकरी आहे. त्यांची विठ्ठलाप्रमाणे पूजा करतो. गेल्या 35 वर्षांत काहीही बदलले नाही. 1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली, आज मोदी शहा तेच करत आहेत. पवार आहेत तिथेच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आजही पवार आहेत. पवार आमचे अमिताभ बच्चन असून 80व्या वषीर्ही तरुणाईला भुरळ पाडत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले..
पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी गुरुवारी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर टीका केली. आव्हाड म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचा कांदा चालतो, साखर चालते, तिथले नेते नवाज शरीफ यांना मिठ्या मारलेल्या चालतात आणि इथे येऊन ते पाकिस्तानवर टीका करतात. हे धोरण दुटप्पीपणाचे आहे.. तसेच मोदी मंदीवर काही बोलत नाहीत.शेतीमाल,भावावर बोलत नाहीत. महाराष्ट्रावर आलेले कोल्हापूर,सांगली इथले संकट नाही दिसले नाही.
भाजप शिवसेना युतीवर बोलताना ते म्हणाले की,शिवसेनेला 100 जागा दिल्या तरी युती होईल अन्यथा त्यांचा पक्ष फुटेल. आता कोणीही पक्षांतर करणार नाही. सगळ्या जागा भरल्यात असेही ते म्हणाले.