'मोदीजी कांद्यावर बोला' पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:38 PM2024-05-16T12:38:53+5:302024-05-16T12:48:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत गोंधळ घालणारा तरुण हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आलं आहे.

Sharad Pawar party worker who created a disturbance in the meeting of PM Modi | 'मोदीजी कांद्यावर बोला' पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता

'मोदीजी कांद्यावर बोला' पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता

PM Narendra Modi Sabha : सध्या राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवूनही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही. निर्यातमूल्य आणि निर्यात करामुळे कांद्यावर लादलेल्या अघोषित निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील सभेत याचा प्रत्यय आला. सभेत मोदींच्या भाषणादरम्यान, एका तरुणाने अचानक कांद्याचा प्रश्न उपस्थित करत गोंधळ घातला. पोलिसांनी त्या तरुणाला लगेच बाहेर काढलं. मात्र आता या तरुणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या पिंपळगाव येथे नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित होते. मात्र मोदी भाषणाला उभे राहताच सभेत मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना अचानक एक तरूणाने मध्येच उठत 'कांद्यावर बोला' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाहेर काढला. मात्र आता हा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे.

तरूणाच्या घोषणा बाजीनंतर पंतप्रधान मोदींनी काही सेकंद भाषण थांबवलं होतं. त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारे करून तरूणाला खाली बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही मोदी मोदीच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणेनंतर मोदींनी जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.

मात्र आता सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आलं आहे. किरण सानप असे या तरुणाचे नाव असून तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. दुसरीकडे शरद पवार यांना यबाबत विचारले असता त्यांनी किरण सानपचे कौतुक केलं आहे. "मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकर्‍यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे," असं पवारांनी म्हटलं.

Web Title: Sharad Pawar party worker who created a disturbance in the meeting of PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.