शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 02:10 PM2024-06-22T14:10:38+5:302024-06-22T14:11:59+5:30
मराठा आणि ओबीसी आंदोलनावरून भाजपा नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांनी नेहमी ओबीसी विरोधी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपूर - राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात शरद पवारांची भूमिका कायम ओबीसीविरोधात राहिली असून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मोठं षडयंत्र सुरू आहे असा गंभीर आरोप भाजपातील ओबीसी नेते परिणय फुके यांनी केला आहे.
परिणय फुके म्हणाले की, मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं तर आमची हरकत नाही परंतु ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. जेव्हापासून जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केले आहे तेव्हापासून ओबीसी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या मागणीला विरोध केला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राजकारणाचा हेतू आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच गेल्या काही घडामोडी पाहिल्या तर मराठा समाजाला राज्य शासनाने आरक्षण दिले आहे. ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सरकारने घेतली आहे. तरीही जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागत असतील तर या दोन्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल हेच जरांगे यांना हवं आहे. जरांगेंच्या पाठिमागून मोठं षडयंत्र सुरू आहे असा दावा फुके यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
त्याचसोबत मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तेव्हा पहिल्यांदा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात. हेच ओबीसी समाजाचा कार्यकर्ता उपोषण करत असेल तर त्यांना भेटायला यापैकी कुणी जात नाही. मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार आहेत असा संदेश पवार गटाचे नेते महाराष्ट्राला देत आहेत. शरद पवारांचे अनेक वर्षाचे राजकारण हे मराठा बेस्ड आहेत. ओबीसीविरोधात राजकारण केले आहे. शरद पवार हे ओबीसींच्या विरोधात आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष यांची ओबीसींविरोधातील भूमिका समोर आली आहे असं सांगत परिणय फुके यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी ज्यावेळी आंदोलनाची सुरुवात केली. सगेसोयरेबाबत जीआरही निघाला, अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली. ज्यांच्या जात प्रमाणपत्रावर मराठा आहे, त्यांना आणि सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत ही मागणी म्हणजे महाराष्ट्रातल्या ६५ टक्के ओबीसी जनतेवर मोठा अन्याय करणारा आहे. ओबीसी समाजाला आजही पुरेसे आरक्षण मिळत नाही. त्यात जर मराठा समाज आला तर हे आरक्षण ५ टक्केही राहणार नाही. त्यामुळे ओबीसी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.