पवारांच्या 'या' दोन अटी अमान्य केल्याने सरकार स्थापण्याची भाजपची संधी हुकली ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:35 PM2019-11-30T12:35:29+5:302019-11-30T12:59:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्यास तयारी होता, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजप नेतृत्वाने नकार दिला असून सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त 'नवभारत टाईम्स' या हिंदी पोर्टलने दिले आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यामध्ये केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपने नकार दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.
राज्यात मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार चालवले होते. त्यामुळे नेतृत्व बदल करण्याच्या मूडमध्ये मोदी-शाह नव्हते. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांना बदलने शक्य नव्हते, असंही सुत्रांनी सांगितले.