NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 09:03 PM2023-09-26T21:03:29+5:302023-09-26T21:04:22+5:30
NDA शी फारकत घेतलेला AIADMK पक्ष आता विरोधकांच्या INDIA आघाडीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी काहीच महिने शिल्लक असून, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधकांची इंडिया आघाडी मजबूत होत आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या एनडीए युतीला मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेतील मोठा पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. AIADMK ने पत्रकार परिषद घेऊन औपचारिकपणे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मधून बाहेर पडण्याची घोषणा केली. यानंतर आता AIADMK हा पक्ष विरोधकांच्या INDIA आघाडीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे.
महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नाईलाजाने महिला आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागला. यापूर्वी देशात कुणीही महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात विचारही केला नव्हता, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. यावर, शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मीडियाशी बोलताना शरद पवार यांना AIADMK पक्षाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?
NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का, यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना, AIADMK पक्षाचा इंडिया आघाडीत समावेश करण्यापूर्वी द्रमुक किंवा त्यांचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचा सल्ला घेतला जाईल. द्रमुक हा इंडिया आघाडीचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे द्रमुक किंवा स्टॅलिन यांच्याशी चर्चा केल्याशिवाय याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, AIADMK मुख्यालयात पक्षाचे प्रमुख एडप्पादी के पलानीस्वामी (EPS) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत NDA पासून वेगळा होण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नादुराई यांच्यावर सीएन अण्णादुराई आणि जे जयललिता यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.