"काही शहाणपणाचे..."; लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:40 PM2024-06-25T14:40:00+5:302024-06-25T15:10:22+5:30
Lok Sabha Session 2024 : लोकसभेत खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे.
Nilesh Lanke Oath : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या ४८ खासदारांनी शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही शपथ घेतली. निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीमधून शपथ घेतली. लंकेंच्या या शपथविधीची सध्या महाराष्ट्राच्या राजकारण जोरदार चर्चा सुरु आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्याने त्यांनी विरोधक सुजय विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं जात आहे. तसेच निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीची सगळीकडे जोरदार चर्चा होती. प्रचारादरम्यान सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली होती. इंग्रजी भाषेवरुनही सुजय विखे यांनी निलेश लंके यांची खिल्ली उडवली होती. निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन, असं देखील सुजय विखे म्हणाले होते. निलेश लंकेंना संसदेत जाऊन इंग्रजी तरी बोलता येईल का अशी टीका देखील केली होती. त्याला आता निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं दात आहे.
निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. शरद पवार यांनी निलेश लंकेंनी सुजय विखेंना दिलेल्या प्रत्युत्तराचा आनंद असल्याचे म्हटलं आहे. "मी सरळ सांगितलय कोणत्याही भाषेत बोलता येते. त्यामुळे एखादी जनमानसात काम करणारी व्यक्ती देशपातळीवरील संसदेत जात असेल तिच्या भाषेवरुन प्रश्न उपस्थित करणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. त्याला उत्तर निलेश लंकेंनी दिले याचा आम्हाला आनंद आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं.
"लोकांच्यासाठी काम करण्याची जिद्द मनात असेल तर कोणतीही भाषा त्याला अडचण ठरु शकत नाही. आज शपथ इंग्रजीत घेऊन हिनवणाऱ्यांना तुम्ही उत्तर दिलेच पण पुढील ५ वर्षात खासदार म्हणून नगर दक्षिणच्या लोकांना न्याय द्याल हा विश्वास आहे," असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.