"चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी..."; शरद पवार यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 09:02 AM2022-06-11T09:02:08+5:302022-06-11T09:34:14+5:30
Sharad Pawar Reaction Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी (१० जून) मतदान पार पडलं. ...
Sharad Pawar Reaction Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी (१० जून) मतदान पार पडलं. या मतदानाच्यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. त्यामुळे निकाला चांगलाच उशीर झाला. पण अखेर मध्यरात्री १ च्या सुमारास शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करून इतर मतांची मोजणी झाली आणि त्यात भाजपाचे तीन तर मविआचे तीन उमेदवार निवडून आले. शिवसेनेने दिलेला दुसरा उमेदवार संजय पवार यांचा मात्र दोन मतांनी पराभव झाला. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.
"राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटा मध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेलं नाही. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळालं ते एका अपक्ष आमदाराचं होतं. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसं केलं होतं. पण भाजपाने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आलं आहे", अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली.
"प्रफुल्ल पटेल यांना एक जास्तीचे मत मिळाले. त्याबाबत मला कल्पना आहे. ते मत अपक्ष आमदाराचे आहे. त्या अपक्ष आमदाराने शिवसेनेला मत दिले नसते हे मला माहिती आहे. त्यामुळे मी या गोष्टींमध्ये शब्द टाकला नाही. ज्या मतांवर आक्षेप घेतला त्यात भाजपाने रडीचा डाव खेळला. मत दाखवायचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यात काही गैर नाही", असे पवार म्हणाले. तसेच, "उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं, तरी त्यांनी रिस्क घेतली. निवडणुकीत रिस्क घ्यावीच लागते. त्यांनी ते केलं त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आता विधानपरिषद व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल एकत्र बसून चर्चा करणार", असेही पवारांनी स्पष्ट केलं.