नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 03:50 PM2024-04-21T15:50:09+5:302024-04-21T15:50:59+5:30

Sharad Pawar News: सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar reaction over eknath khadse decision to return in bjp soon | नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

Sharad Pawar News: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये परत जाणार असल्याबाबत विधान केले होते. त्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर भाजपामधील काही नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्या या निर्णयावर टीकाही केली. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या निर्णयाबाबत सूचक शब्दांत भाष्य केले.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांना एकनाथ खडसे यांच्या भाजपामध्ये परत जाण्याबाबतच्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याची भूमिका महाराष्ट्रात कधीही नव्हती. आता ती सुरु झाली आहे. त्यामधून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित ही अवस्था एकनाथ खडसे यांच्यावर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इच्छा नसताना नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी, असा माझा समज आहे. एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे, असा दावा शरद पवार यांनी केला. 

सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू

जळगाव भागात ज्यांचा प्रभावीपणे काम करण्याचा लौकीक आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा एकनाथ खडसे यांनी दिला आहे का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. मला याबाबत माहिती नाही. जयंत पाटील यांना माहिती असेल. ते संघटनेचे काम पाहतात, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. माझी भाजपामधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचे म्हणणे होते की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवे. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे त्यांना कळवले होते. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली होती.
 

Web Title: sharad pawar reaction over eknath khadse decision to return in bjp soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.