“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 04:11 PM2024-09-29T16:11:55+5:302024-09-29T16:14:26+5:30

Sharad Pawar News: संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना उमेदवार निवडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar reaction over maharashtra assembly 2024 date and seat sharing in maha vikas aghadi | “१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज

“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज

Sharad Pawar News: निवडणूक आयोग तारीख ठरवेल. माझा अंदाज आहे की, ६ ते १० च्या दरम्यान तारखा जाहीर करतील. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसांत जागेचा निर्णय होईल. आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल. काही जागा काँग्रेस आणि सेनेला द्याव्या लागतील. आघाडी आहे म्हटल्यावर सगळ्या जागा घेऊन चालत नाही काही जागा सोडव्या लागतील. जागा सोडून चालणार नाही त्यांचे कामही करावे लागेल. आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये वेगळे वातावरण आहे. लोकसभेला वेगळं चित्र होते. प्रधानमंत्री सांगत होते ४०० च्या वर जागा येतील. ५ वर्षपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक आला. राष्ट्रवादीने १० जागा लढल्या त्यातील ८ आल्या. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते. म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणे केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठरवले होते. १ लाख ५८ हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली, याची आठवण शरद पवार यांनी करून दिली. 

संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत

योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे. या कमिटीमध्ये जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे. जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो उमेदवार इच्छुक आहे, त्याला काही विचारले जाणार नाही. गावातील सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, इंदापूर मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपाचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारीवर लढतील, असे बोलले जात आहे. याबाबत शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. निवडणुकीत ज्यांनी कष्ट केले त्या कार्यकर्त्यांचे ऐकावे लागेल.

 

 

Web Title: sharad pawar reaction over maharashtra assembly 2024 date and seat sharing in maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.