छगन भुजबळ परतणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, “माझी अन् त्यांची भेट झालेली...”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:09 PM2024-06-20T14:09:08+5:302024-06-20T14:14:28+5:30
Sharad Pawar On Chhagan Bhujbal Statement: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शरद पवार यांनी सूचक भाष्य केले आहे.
Sharad Pawar On Chhagan Bhujbal Statement: लोकसभेची निवडणूक झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत. भाजपाच्या ४०० पारच्या घोषणेपासून ते मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे, इथपर्यंत विविध विधानांमुळे छगन भुजबळ यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यातच छगन भुजबळ हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. छगन भुजबळ यांच्या विधानाबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपा तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपा आणि मोदी सरकारच्या विश्वासाला तडा बसला. ते कायम सांगत होते की, मोदींची गॅरंटी. आता मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. या निवडणुकीत ते दिसले. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेली नाही, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.
छगन भुजबळ परतणार का?
मी राष्ट्रवादी बरोबर आहे. दादांबरोबर नाही. छगन भुजबळ यांच्या या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? छगन भुजबळांचे परतीचे संकेत आहेत का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी माहिती नाही. माझी आणि त्यांची गेल्या वर्ष सहा महिन्यामध्ये भेट झालेली नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये दुष्काळासह बाकी काही प्रश्न आहेत. या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याबाबत एक बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहे. दुधाच्या प्रश्नासंदर्भातही काही प्रश्न आहेत. दुधाची किंमत पाच रुपये प्रतिलटर प्रमाणे वाढून देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.