“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 08:13 PM2024-02-27T20:13:49+5:302024-02-27T20:14:20+5:30
Sharad Pawar News: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वर्तन कधी पाहिले नव्हते, अशी टीका शरद पवारांनी केली.
Sharad Pawar News: मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळे वळण घेताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसटीआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या. मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका करताना दिसत आहेत. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा केला जात आहे. याला शरद पवार यांनी उत्तर दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, तुम्हाला चौकशी करायची असेल तर अवश्य करा. तुम्हाला वाट्टेल ते करा आणि चौकशी पूर्ण करा. कर नाही त्याला डर कशाची, आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. सत्ताधारी लोक म्हणत आहेत की, फोन केले होते, तसे वाटत असेल तर आमचे फोन तपासा आणि मनोज जरांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन तपासा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते
मनोज जरांगे यांना केवळ एकदाच भेटलो आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू झाल्यावर त्यांना भेटायला गेलो होतो. आम्हा दोघांमध्ये तेव्हा संभाषण झाले. त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने आमचे बोलणे नाही की भेट नाही. असे असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी माझ्यावर असा आरोप करणं चुकीचे आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, जबाबदार लोकांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासारख्या एखाद्या जबाबदार पदावर बसल्यानंतर त्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवे. त्यांचे वक्तव्य हे पोरकटपणाचे आहे. एखादी जबाबदार व्यक्ती इतके खोटे बोलताना यापूर्वी पाहिले नाही. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचे वर्तन पाहिले आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वर्तन कधी पाहिले नव्हते, अशी टीका शरद पवारांनी केली.