“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:01 PM2024-05-01T16:01:13+5:302024-05-01T16:07:53+5:30
Sharad Pawar News: उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र कसे बदलणार आणि नवीन काय करणार, याबाबत प्रधानमंत्री अवाक्षर काढत नाही. केवळ टीका करत राहतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar News: देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर दोन लोकांवर बोलतात. एक शरद पवार आणि दुसरे आहेत आमचे उद्धव ठाकरे. या ठाकरेंवर, शिवसेनेवर टीका करायची, माझ्यावर टीका करायची. माझ्यावर त्यांनी सांगितले काय? महाराष्ट्रामध्ये एक माणूस ४५ वर्ष महाराष्ट्रात फिरतोय आणि लोकांचे सरकार अस्थिर करतोय, ही गमतीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात मी फिरतोय, माझे राज्य आहे, माझे लोक आहेत, त्यांच्यासमोर जाणार, त्यांच्याबरोबर बोलणार हा लोकशाहीचा माझा अधिकार, पण ते सुद्धा सहन होत नाही. त्यासाठी त्यांची टीका टिप्पणी आम्हा लोकांवर अधिक आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार शरद पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना घेतला. महाराष्ट्राची निवडणूक आहे, आणि ती निवडणूक पाच टप्प्यात आहे. अशी गंमतीची गोष्ट आहे. तमिळनाडू राज्य. तिथे एकंदरीत खासदारांची संख्या ४०. आणि ४० जणांची निवडणूक एका दिवशी. महाराष्ट्राच्या खासदारांची संख्या ४८. इथली निवडणूक पाच दिवसांची, उत्तर प्रदेशची निवडणूक एका दिवसात आणि महाराष्ट्राची ५ दिवसांत. हे कशासाठी, अशी विचारणा शरद पवार यांनी केली.
ही निवडणूक नियमानुसार होत असली तरी समान संधी मिळत नाही
या देशाचे प्रधानमंत्री, ज्यांना जिथे आपली शक्ती कमी असे वाटते, त्या ठिकाणची निवडणूक एकाऐवजी ४-४ दिवस आणि त्यांना टिका टिप्पणीच करता येते. अनेक ठिकाणी ते सभा घेतात. सभा घ्यायला काही हरकत नाही, पण एका पक्षाला तुम्ही १० वेळेला सभा घ्यायला संधीही देता आणि काही पक्षांना एका दिवसात संपवा म्हणून सांगता. याचा अर्थ ही निवडणूक नियमानुसार होत असेल, पण समान संधी याठिकाणी मिळत नाही. अनेक प्रश्न पुढे आहेत. कुणीही आणि विशेषत: प्रधानमंत्री असेल, अशा व्यक्तीने दोन गोष्टी करायच्या असतात. एक उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र आम्ही कसे बदलणार आहोत, नवीन काय करणार आहोत आणि मग टीका टिप्पणी करायची असेल तर ती करता येते, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, देशाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी स्वच्छ प्रामाणिकपणाने वस्तुस्थिती सांगायला हवी. ती न सांगता इतरांवर टीका करायची आणि चुकीच्या गोष्टी सांगायच्या. ते सांगतात, आमच्या हातात सत्ता आली की, भ्रष्टाचार खत्म करू. आज काय चित्र दिसतेय? सर्वत्र भ्रष्टाचार, आणि त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सत्ताधारी पक्षाला चालत आहे. आज सत्तेचा गैरवापर करणे ही भूमिका आजच्या भाजप सरकारची आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.