Sharad Pawar Sadabhau Khot: "सूर्यावर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी..."; शरद पवारांवरील टीकेनंतर सदाभाऊ खोतांना NCP चं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:24 PM2022-03-29T17:24:46+5:302022-03-29T17:25:11+5:30

सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केली होती घणाघाती टीका

Sharad Pawar Sadabhau Khot Controversy NCP leader Mahesh Tapase gives Warning with Sun Example | Sharad Pawar Sadabhau Khot: "सूर्यावर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी..."; शरद पवारांवरील टीकेनंतर सदाभाऊ खोतांना NCP चं चोख प्रत्युत्तर

Sharad Pawar Sadabhau Khot: "सूर्यावर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी..."; शरद पवारांवरील टीकेनंतर सदाभाऊ खोतांना NCP चं चोख प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी घणाघाती टीका केली. स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या मुद्द्यावर बोलताना सदभाऊ खोत म्हणाले की शरद पवार यांनी त्यांचं आडनाव बदलून घ्यायला हवं आणि 'आगलावे' असं करायला हवं. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी खोत यांच्यावर सडकून टीका केली.

महेश तपासे काय म्हणाले?

"विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आल्याने पवारांवर टीका करुन देवेंद्र फडणवीस यांना खूश करण्यासाठी सदाभाऊ खोत अशी वक्तव्यं करत आहेत हे जनतेला माहीत आहे. सदाभाऊ खोत यांना गोपीचंद पडळकरांची लागण झाली आहे. आतापर्यंत शांत बसलेले सदाभाऊ खोत आमदारकी मिळवण्यासाठी असं करत आहेत. पण एक लक्षात घ्या की तुम्ही सूर्यावर कितीही थुंकण्याचा प्रयत्न केलात तरी थूक तुमच्या तोंडावरच पडणार आहे", अशी चोख प्रत्युत्तर तपासे यांनी दिलं.

"सांगलीशी पवारांचा काय संबंध? असा प्रश्न विचारण्याऱ्यांना माझा प्रश्न आहे की सूर्याचा किरणांशी काय संबंध असा सवाल होऊ शकतो का? शरद पवार हे लोकनेते आहेत", असंही त्यांनी नमूद केलं.

"सदाभाऊ खोतांचे 'उपाशी खोत' असंच नामकरण करण्याची गरज"

"सत्तेपासून उपाशी असलेल्या सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते असं बरळू लागले आहेत. सदाभाऊ खोतांचे 'उपाशी खोत' असंच नामकरण करण्याची गरज आहे. भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेत मंत्रीपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यानंतर काहीच सुचेनासे झाले आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रणेते ठरल्यानेच सदाभाऊ खोत त्यांच्याविषयी बरळू लागले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत मात्र त्यांची शरद पवारांबद्दल बोलण्याइतपत लायकी नाही हे पहिले त्यांनी लक्षात ठेवावे" असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?

"शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचे. त्यांचे सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेले आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावे", असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.

Web Title: Sharad Pawar Sadabhau Khot Controversy NCP leader Mahesh Tapase gives Warning with Sun Example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.