“लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण मविआ ऐक्यासाठी दोन पावले मागे आलो”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:37 PM2024-06-21T17:37:06+5:302024-06-21T17:39:51+5:30
Sharad Pawar News: आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे. लोकांची जास्तीत जास्ते काम करा. आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीला सर्वच पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असताना दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांची चाचपणी सुरू असून, बैठकांचे सत्र सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जागावाटपावरून महायुतीत तणाव पाहायला मिळत आहे. आता शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून सर्वकाही आलबेल नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून राहावे, यासाठी दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यातील निसर्ग हॉटेलला आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील आणि सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले
आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, याची तयारी ठेवा. त्यासाठी लोकांची जास्तीत जास्ते काम करा. राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
दरम्यान, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत कुठलीही गडबड होऊ नये, यासाठी शरद पवारांनी लोकसभेला कमी जागांवर समाधान मानले. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाची मोठी ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झाला आहे, असे शरद पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.