“मोहम्मद युनूस पक्के सेक्यूलर, बांगलादेशची परिस्थिती सुधारतील”; शरद पवारांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:04 PM2024-08-12T13:04:47+5:302024-08-12T13:06:00+5:30
Sharad Pawar On Bangladesh Crisis: बांगलादेशच्या अंतरिम सरकारची सूत्रे हातात घेतल्यावर मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.
Sharad Pawar On Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अचानक घडलेल्या सत्तांतरामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात असताना सत्ता गमावलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या सत्ताबदलामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करून खळबळ उडवली आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले असले तरी हिंसाचार थांबायला तयार नाही. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतली आहेत. यासंदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारचे अंतरिम नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस करत आहेत. अद्यापही तेथील हिंसाचार कमी झालेला पाहायला मिळत नाही. सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
मोहम्मद युनूस स्वतः पक्के सेक्यूलर आहेत
मोहम्मद युनूस बारामतीत आले होते. बांगलादेशातील परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? मोहम्मद युसूफ यांना तुम्ही शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे मोहम्मद युनूस स्वतः पक्के सेक्यूलर आहेत. ते कधीही समाजामध्ये, भाषिकांमध्ये तसेच धर्मियांमध्ये अंतर वाढावे, असे काम करणार नाहीत. त्यामुळे बॅलेन्स भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची बांगलादेशला गरज होती. तेथील परिस्थिती ते सुधारणा आणू शकतील. भारत सरकारने बांगलादेशमधील परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, घुसखोरी करणाऱ्या ११ बांगलादेशींना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडले. बांगलादेशींना रोखण्यासाठी बांबूचे कुंपण अधिक मजबूत करण्यापासून ते रात्री जागता पहारा देण्यापर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही मीटर अंतरावरील मेघालयातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली आहे. खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या किंवा प्रसारित केल्यास संबंधित प्रसारमाध्यमांवर बंदी घातली जाईल, असा सज्जड इशारा बांगलादेश अंतरिम सरकारने दिला.