“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 04:13 PM2024-09-25T16:13:07+5:302024-09-25T16:15:32+5:30

Sharad Pawar News: आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले. परळीमध्ये मोठी सभा घेऊ आणि दाखवून देऊ, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

sharad pawar said two months left and will not rest unless the state government is changed | “२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

Sharad Pawar News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला असून, ही मालिका कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते  राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर परळीचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार हे नवीन चेहऱ्याच्या शोधात असून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर राजेभाऊ फड यांना पक्षात घेत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजेभाऊ फड हे कन्हेरवाडी गावचे सरपंच आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात  महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत, असे म्हटले जात आहे. यातच राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार शरद पवारांनी बोलून दाखवला आहे. 

राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही

सत्ता लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो. त्यावर कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारे पाहिजे. येथील चित्र बदलत आहे. लोकसभा निवडणुकीत तेच दिसले. देशाचे  पंतप्रधान सांगत होते, आम्ही ४०० पार निवडून येणार, पण त्यांचे  किती खासदार आले. राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या, त्यापैकी ८ जागा जिंकून आणल्या. आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले. ही तर फक्त सुरुवात आहे. परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. आता फक्त दोन महिने राहिले आहेत. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, राजेभाऊ फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहू शकते. त्यातच, शरद पवारांनी या पक्षप्रवेशावेळी तसे संकेतही दिले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी परळीत विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले आहे.
 

Web Title: sharad pawar said two months left and will not rest unless the state government is changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.